– तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प श्री शिवाजी महाराज मोरे यांचे गौरवोद्गार
– पुणेकर मंडळी, श्रमदान श्रेष्ठदान ग्रुप व सर्व ग्रामस्थ यांचा संयुक्त उपक्रम
– उपक्रमांतर्गत बकुळ ,कदंब, वड,पिंपळ आदींसह सुमारे 111 वृक्षांचे रोपण
कोल्हापूर : (मानस न्युज 9 – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
पुणेकर मंडळी, श्रमदान श्रेष्ठदान ग्रुप व सर्व ग्रामस्थ यांनी संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला “वृक्षारोपण” उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज श्री शिवाजी महाराज मोरे यांनी काढले.
कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या पुणेकर मंडळी व गावातील श्रमदान श्रेष्ठदान ग्रुप तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने “वृक्षारोपण” उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
कोरोना काळात आपल्याला कळाले “ऑक्सिजनचे महत्त्व”
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे श्री मोरे म्हणाले, की सध्या ऋतुचक्र फारच बदलले आहे त्यामुळे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. अमर्याद वृक्षतोड झाल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे ध्रुवीय भागातील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. दर दोन वर्षानंतर समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज आयपीसीसी या जागतिक संस्थेच्या सर्वेनुसार भारताच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली मुंबई ,कोलकत्ता, इंदोर ,गोवा ही शहरे 2050 पर्यंत पाण्याखाली जाण्याचा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. आणि हे जर थांबवायचे असेल तर वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे.
वृक्ष हे परोपकारी आहेत. माऊलींच्या अभंग प्रमाणे माऊली सत्पुरुषाचे वर्णन करताना म्हणतात जो खांडावया घाव घाली का लावणी जया केली दोघा एकची सावली वृक्षतो जैसा म्हणजे वृक्ष हे पाणी घालणाऱ्याला ही सावली देते व तोडणाऱ्यालाही सावली देते. म्हणून वृक्ष हे संतांचे रूप आहे झाडे ही कार्बनडाय-ऑक्साइड शोषून घेतात व ऑक्सिजन देतात. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे.
जिल्ह्यात अजून 9.76% वृक्षारोपणाची गरज
जागतिक वनस्पती तज्ञांच्या अहवालानुसार आपल्या देशामध्ये उपलब्ध भूभागाच्या तुलनेनुसार 33% भूभागावरती वृक्ष असणे गरजेचे आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण 20% आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण 23.24% आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये अजून 9.76% वृक्षारोपणाची गरज आहे.
सर्व देशी वृक्ष लावले पाहिजेत
गेल्या 70 वर्षापासून देशांमध्ये हे प्रमाण वाढवण्यासाठी ग्रीनसीडीया वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. आणि हे वृक्ष पर्यावरणासाठी घातक आहेत. या वृक्षाच्या भोवती मुंगी सुद्धा जगत नाही. त्यामुळे आपली जैविक शृंखला धोक्यात येऊ शकते. *अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाच्या मते भूतलावरील* मधमाशी जेव्हा नष्ट होईल. तेव्हा चौथ्याच वर्षी पृथ्वीवरील मनुष्यवस्ती नष्ट होईल. त्यामुळे ही जैविक शृंखला अबाधित ठेवायची असेल तर आपण ही ग्रीन सीडिया झाडे कमी करून त्या ठिकाणी वड, पिंपळ, कडूलिंब, बकुळ ,कदम असे सर्व देशी वृक्ष लावले पाहिजेत.
देहुगाव येथे वृक्षदाई नावाची संस्था सुरू
यामुळे आम्ही देहुगाव येथे वृक्षदाई नावाची संस्था सुरू केल्याचे महाराजांनी सांगितले. या संस्थेची टॅग लाईन आहे *एकच लक्ष देशी वृक्ष आणि या संस्थेच्या* माध्यमातून भंडारा डोंगर व देहूगाव परिसर येथे हजारो देशी वृक्षांचे रोपण व वृक्ष संवर्धन करण्याचे काम ही संस्था करत आहे. आणि या संस्थेमध्ये कामानिमित्त महाराष्ट्रभरातून आलेले वृक्षप्रेमी काम करत आहेत. यामध्ये व्हनाळी गावातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांचा सहभाग अग्रगण्य आहे. त्यामुळे आपणही या तरुणांचा आदर्श घेत आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करावे, असे आवाहनही मोरे यांनी केले.
सुमारे 111 वृक्षांचे रोपण
या उपक्रमांतर्गत बकुळ ,कदंब, वड,पिंपळ आदींसह सुमारे 111 वृक्षांचे श्री शिवाजी महाराज मोरे व श्री संतोष महाराज हगवणे यांच्या हस्ते व्हनाळी बाचणी रोड व स्मशानभूमी येथे रोपण करण्यात आले.
मुले, आई-वडील मानून वृक्ष सेवा करावी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. यावेळी गावातील तरुणांनी एकत्र येऊन राजकारण विरहित काम करण्याचे आवाहन त्यांनी केले सर्वांनी आपल्या राजकीय चपला बाहेर ठेवाव्यात. यातच गावाचे हित असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन कसे करावे, याचे उत्तर उत्तम उदाहरण कर्नाटकमधील सालुमरदा थमक्का यांचे आहे. त्यामुळे थमक्का आजींचे अनुकरण करावे व त्याप्रमाणे ज्यांना मुलं नाहीत. त्यांनी झाडांना मुले मानावे व ज्यांना आई-वडील नाहीत. त्यांनी झाडांना आई-वडील मानावे व वृक्ष सेवा करावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
देहू गावचे माजी उपसरपंच संतोष हगवणे यांनी “ग्राम विकासाची माहिती” सर्व ग्रामस्थांना व ग्रामपंचायत सदस्यांना दिली. कार्यक्रमाचे स्वागत रमेश जाधव यांनी केले तर सर्व मान्यवर तसेच या उपक्रमाला मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचे व ग्रामस्थांचे आभार रवींद्र पवार यांनी मानले.
यावेळी व्हनाळी गावच्या सरपंच सौ. छायाताई सुतार, उपसरपंच सौ. कस्तुरीताई निचिते, देहूगाव पुणे येथून आलेले वृक्षदाई संस्थेचे सदस्य विलास बोराडे, सुभाष पाटील, सचिन पवार, शरद मेथे, प्रदीप पाटील, बाळासाहेब दरेकर, सतीश चव्हाण, श्रमदान श्रेष्ठदान ग्रुपचे सर्व सदस्य, गावातील सर्व तरुण मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.