– कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते अनुदानाचा पाच लाखांचा चेक कुटुंबीयांना प्रदान
– आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
कपिलेश्वर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील दशरथ ज्ञानदेव तोरस्कर या बांधकाम व्यावसायिकाचा मार्च 2021 मध्ये विहिरीचे बांधकाम करत असताना तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या वारसांना कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते 5 लाख रुपयांचा चेक प्रधान करून “आर्थिक आधार” देण्यात आला. यामुळे आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. निधी तत्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल तोरस्कर यांच्या कुटुंबीयांनी नागटिळे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
निधी तत्काळ मिळवून देण्यात यश
कपिलेश्वर येथील रहिवाशी बांधकाम व्यावसायिक दशरथ ज्ञानदेव तोरस्कर हा पत्नी दिपाली व सोहम व शुभम या दोन मुलांसह राहत होता. काम करत असताना त्याच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला. आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांनी तत्काळ तोरस्कर कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. यानंतर त्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्यासंदर्भात आरपीआय कामगार आघाडीतर्फे पाठपुरावा करण्यात आला. तसेच शासन दरबारी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हा निधी तत्काळ मंजूर झाला.
पाच लाखांचा धनादेश प्रदान
कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते व सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत तोरस्कर यांच्या वारसांना प्राथमिक स्वरूपात पाच लाखांचा धनादेश दि. 23/10/2022 रोजी प्रदान करण्यात आला. तसेच इतर शासकीय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांचा निधीही उपलब्ध करून दिला. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दशरथ तोरस्कर यांच्या कुटुंबीयांनी नागटिळे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले. यावेळी आरपीआय कामगार आघाडीचे अशोक कांबळे, रविंद्र पाटील, पांडुरंग चव्हाण, कृष्णात लोखंडे, बाळू उर्फ गणपती कांबळे, महादेव गायकवाड, बाळू लोहार आदी उपस्थित होते.
28 योजनांचा लाभ घ्यावा
यावेळी बोलताना आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे म्हणाले, प्रलंबित मागण्यांसाठी, पाठपुरावासाठी व कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आघाडीतर्फे पुढाकार घेतला जातो. एकाही बांधकाम कामगाराला मिळणाऱ्या शासकीय योजनांपासून वंचित ठेवणार नाही. यासाठी जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी कामगार आघाडीमध्ये आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना मंडळाच्या 28 विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. असेही यावेळी त्यांनी सांगितले.